बेळगाव / प्रतिनिधी
मराठी राजभाषा दिन आणि ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक राजहंस गडावर मराठीचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य मूर्तीसमोर मराठी भाषेचा जयजयकार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात गडावरील श्री सिद्धेश्वर मंदिरात पूजा आणि आरतीने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पदपूजन करण्यात आले. यावेळी वामनराव पाटील, गोपाळ पाटील, यल्लाप्पा रेमाणाचे आणि इतर प्रमुख नेत्यांनी विधीवत पूजन केले.
कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गोपाळराव देसाई, शिवाजी मंडोळकर आणि पांडुरंग सावंत यांच्यासह मान्यवरांनी कुसुमाग्रजांच्या साहित्यातील योगदानाचे स्मरण केले.
भाषा टिकली तरच आपली संस्कृती आणि अस्मिता जिवंत राहील, असे प्रतिपादन सीमाकवी रवींद्र पाटील यांनी केले. बेळगाव सीमाभागातील मराठी बांधवांची जिद्द आणि मराठी भाषेची अभिजात परंपरा हीच आपली खरी ओळख असल्याचे रवींद्र पाटील यांनी म्हटले.
सीमाभागातील मराठी भाषिक अन्यायाविरुद्ध लढत असून, येथील मराठी भाषा दिन हा महाराष्ट्रापेक्षाही अधिक भव्य स्वरूपात साजरा होतो, असे साहित्यिक गुणवंत पाटील यांनी सांगितले. मराठी माणूस हा इथला भूमिपुत्र असून आपल्या हक्कासाठी सर्वांनी वज्रमुठ आवळली पाहिजे, असे आवाहन गुणवंत पाटील यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी शब्दकोश तयार करून प्रशासकीय व्यवहार मराठीत सुरू केले, याचा आम्हा सर्व मराठी भाषिकांना अभिमान आहे, असे शिवसंत संजय मोरे यांनी नमूद केले. मराठी भाषा ही वैज्ञानिक भाषा बनली पाहिजे, अशी अपेक्षा संजय मोरे यांनी व्यक्त केली.
यावेळी १५ मार्चपासून सुरू होणाऱ्या ‘मराठी सन्मान यात्रे’ला शुभेच्छा देण्यात आल्या. या यात्रेत सीमावासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवाजी जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता उघाडे यांनी केले, तर मनोहर हुंदरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्याला बेळगाव आणि परिसरातील अनेक मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी मिळून मराठी भाषेच्या संवर्धनाचा निर्धार यावेळी व्यक्त केला.







