- डीजे, स्प्रिंकलर्स आणि ‘होली मिलन’ला तरुणाईचा प्रतिसाद
- पांगुळ गल्लीत परंपरागत लोटांगणे सकाळीच
बेळगाव / प्रतिनिधी
रंगांची उधळण, पाण्याचे स्प्रिंकलर्स, डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि गल्लोगल्ली पिचकाऱ्यांचा वर्षाव—अशा जल्लोषी वातावरणात बेळगाव शहरात मंगळवारी रंगपंचमी साजरी करण्यात आली. शहर, उपनगरे आणि आसपासच्या भागात सकाळपासूनच रंगोत्सवाची धूम पाहायला मिळाली . एकमेकांना रंग लावत नागरिकांनी होळी-रंगपंचमीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली.
टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर दरवर्षीप्रमाणे ‘होली मिलन’चा सामूहिक रंगोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. उन्हातही स्प्रिंकलर्सच्या गारव्यात तरुणाईने ‘रेन डान्स’ करत जल्लोष केला. विविध वेषभूषा आणि आकर्षक मुखवटे परिधान केलेल्या युवकांनी रंगोत्सवात रंगत आणली.
चव्हाट गल्ली, कामत गल्ली, टेंगिनकेरा गल्ली, गोंधळी गल्ली तसेच चन्नम्मानगर, टिळकवाडी, अनगोळ आदी भागांत रस्ते व उद्यानांमध्ये पाण्याचे फवारे उभारण्यात आले होते. बालगोपालांनी पिचकाऱ्यांमधून रंग उधळत सणाचा मनसोक्त आनंद लुटला. बाजारपेठेत रंग, पिचकाऱ्या आणि मुखवट्यांची खरेदी सोमवारीच तेजीत झाली होती.
दरम्यान, पांगुळ गल्लीतील श्री अश्वत्थामा मंदिर येथे होणारा पारंपरिक लोटांगण कार्यक्रम चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर सकाळी लवकर पार पाडण्यात आला. शेकडो भाविकांनी भक्तिभावाने सहभाग घेतला. ग्रहणाच्या वेधकाळामुळे नागरिकांनी आवश्यक पथ्य पाळून सण साजरा केला.
होळी व रंगपंचमीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व उपनगरांत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे सण शांततेत पार पडला.
एकंदरीत, जल्लोष आणि शिस्त यांचा समतोल राखत बेळगावकरांनी रंगपंचमीचा आनंद लुटला.








