- अंमली पदार्थांसह १.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त
- सीसीबी पोलिसांची कारवाई ; दोघांविरुद्ध कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा
बेळगाव / प्रतिनिधी
गोगटे सर्कल परिसरातील रेल्वे स्थानक मार्गावर नशेच्या अवस्थेत वावरत असलेल्या एका युवकाला शहर गुन्हे अन्वेषण विभागाने (सीसीबी) ताब्यात घेत अंमली पदार्थांसह एकूण १ लाख २१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव वर्धन आनंद कांबळे (वय १९, रा. जनता प्लॉट, पिरनवाडी) असे आहे. त्याच्याकडून सुमारे ९० हजार रुपये किमतीची ८.९२ ग्रॅम एमडीएमए ही बंदी घातलेली अंमली पावडर, ३० हजार रुपये किमतीचा वन प्लस मोबाईल फोन आणि १,९०० रुपये रोख रक्कम असा एकूण १,२१,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वर्धन कांबळे याने अनगोळ येथील अर्जुन तहसीलदार याच्याकडून एमडीएमए हे बंदी असलेले अंमली पदार्थ घेतल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. संबंधित युवकाने या पदार्थाचे सेवन करून नशेत गोगटे सर्कल परिसरात वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
माहितीच्या आधारे सीसीबी पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन कारवाई केली. संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याची झडती घेतली असता अंमली पदार्थ व अन्य साहित्य आढळून आले.
या प्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात वर्धन कांबळे व अर्जुन तहसीलदार या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.







