बेळगाव / प्रतिनिधी
सौंदर्यप्रसाधनांच्या नावाखाली बेकायदेशीरपणे चालणाऱ्या ब्युटी पार्लर, स्किन केअर सेंटर आणि रुग्णालयांवर छापे टाकून आरोग्य अधिकाऱ्यांनी तपासणी केली.
बेळगाव शहरातील आरोग्य अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये असे आढळून आले की, काही अधिकृत ब्युटी पार्लर आणि स्किन केअर सेंटर्स आढळून आले, तर उर्वरित केंद्रे अनधिकृत आणि अकुशल व्यक्तींकडून लोकांकडून चालवली जात असल्याचे उघडकीस आले. शहरातील अशी चार रुग्णालये, क्लिनिक आणि ब्युटी सेंटर्स सील करून बंद करण्यात आली. तसेच ७ पार्लर व रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली आहे.
या कारवाई दरम्यान आरपीडी, टिळकवाडी, कॅम्प, शाहूनगर, रविवार पेठ, अनगोळ, वडगाव, सदाशिवनगर आदी भागात छापे घालण्यात आले. यावेळी कारवाईच्या भीतीने अनेक ब्युटी पार्लर बंद करून संचालक पळून गेल्याचे पाहायला मिळाले. आरोग्य अधिकाऱ्यांनी जनतेला अनधिकृत ब्युटी पार्लर, स्किन केअर सेंटर्स आणि सौंदर्यवर्धक नावाच्या रुग्णालयांची माहिती मोकळेपणाने द्यावी आणि अनधिकृत ब्युटी पार्लरमध्ये जाऊन पैसे आणि आरोग्य धोक्यात आणू नये असे आवाहन केले आहे.
याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की, त्वचारोग (डर्मेटोलॉजिस्ट) संघटना आणि विविध डॉक्टरांनी छोटे दुकानदार उपचार करत असल्याची तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारे, आम्ही अहवाल मागवला आणि छापा टाकून तपासणी करण्यासाठी ३० पथके तयार केली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. बेकायदेशीरपणे काम करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. आम्ही कोणालाही लोकांच्या जीवाशी खेळू देणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिला आहे.