- १.१० लाख रुपये किमतीचा दारू साठा जप्त
- माळमारुती पोलिसांची कारवाई
बेळगाव / प्रतिनिधी
माळमारुती पोलिसांनी काल शहरातील गँगवाडी येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकून तब्बल १ लाख १० हजार रुपये किमतीचा बेकायदेशीर दारू साठा जप्त केला. पोलिसांची धाड पडताच एका महिलेसह तिघा आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या आरोपींमध्ये बाळू दत्ता सकट, ओंकार बाळू सकट आणि एका महिलेचा समावेश आहे. याबाबतची माहिती मिळताच माळ मारुती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्ही. एम. मोहिते आणि त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ताबडतोब घटनास्थळी धाड टाकली. त्यावेळी उपरोक्त तिघा आरोपींनी पोलिसांच्या हातातून निसटून पळ काढण्यात यश मिळवले. तथापि पोलिसांनी घटनास्थळी आढळून आलेला १ लाख १० हजार रुपये किमतीचा बेकायदेशीर दारू साठा जप्त केला. या दारू साठ्यामध्ये विविध कंपन्यांचे व्हिस्की, रम यांच्या टेट्रापॅक मधील दारूचे बॉक्स, तसेच विविध कंपन्यांच्या बियर बाटल्यांच्या बॉक्सचा समावेश आहे.