- पोलिसांची दांडगाई : प्रतिबंधात्मक सूचनांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ५ लाखाचा दंड
- जिल्हा सत्र न्यायालयात कारवाईला आव्हान देणार
बेळगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्र एकीकरण समितीचे सीमाभाग अध्यक्ष आणि युवा नेते शुभम शेळके यांच्याविरुद्ध बेळगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. माळमारुती पोलीस ठाण्याच्या शिफारशीवरून कायदा व सुव्यवस्था विभागाने त्यांच्यावर प्रतिबंधात्मक सूचनांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवत पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या आदेशाविरुद्ध ॲड. महेश बिर्जे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
पोलिसांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये नमूद आहे की शुभम शेळके यांनी वारंवार पोलीस सूचनांकडे दुर्लक्ष केले असून, त्यांच्या विरोधात विविध ठाण्यांमध्ये १९ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तसेच ते दोन भाषिक समुदायांमध्ये तणाव निर्माण करतात, असा उल्लेखही करण्यात आला आहे. मात्र, ही कारवाई राजकीय दबावातून आणि एकतर्फी पद्धतीने करण्यात आली असल्याचा आरोप महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे.
घटनेचा मागोवा घेतला असता, २६ मार्च २०२५ रोजी शुभम शेळके यांना प्रतिबंधात्मक नोटीस देऊन अटक करण्यात आली होती. मराठी जनतेचा अपमान करणाऱ्या नारायण गौडा यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर म्हणून शुभम शेळके यांनी सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला होता. याच व्हिडिओवरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आणि २७ ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावून पाच लाख दंडाची नोटीस देण्यात आली.
यापूर्वीच महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर आणि खजिनदार प्रकाश मरगाळे यांनाही अशाच प्रकारच्या नोटीसी देण्यात आल्या आहेत. सर्व प्रकरणांबाबत न्यायालयात कायदेशीर लढा सुरू असून, या कारवाया मराठी नेतृत्व गप्प बसवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या संदर्भात शुभम शेळके म्हणाले, “मराठी जनतेवरचा हा अन्याय नवीन नाही. आम्ही लोकशाही मार्गाने आपला संघर्ष सुरू ठेवणार आहोत. कोणत्याही धमकीला वा दडपशाहीला घाबरणार नाही. न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास असून, आम्ही आमचे उत्तर कायद्याच्या चौकटीतच देऊ.”
यावेळी ॲड. बाळासाहेब कागणकर, ॲड. एम. बी. बोन्द्रे, ॲड. वैभव कुट्रे, ॲड. अश्वजित चौधरी, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, यल्लप्पा शिंदे, शांताराम होसुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.







