• कॉमर्स शाखेत ९९.१६ टक्के गुणांसह दमदार कामगिरी

बेळगाव : पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी जाहीर झाला असून, यंदाही बेळगावमधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यामध्ये बेळगाव तालुक्यातील उचगाव येथील कुमारी साहिबा खाजामिया सनदी हिने कॉमर्स शाखेत ९९.१६ टक्के गुण मिळवत विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

अंगडी कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या साहिबाने ६०० पैकी ५९५ गुण मिळवत आपल्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फळ मिळवले आहे. ग्रामीण भागातून येत असूनही तिने यापूर्वीच्या शैक्षणिक टप्प्यांमध्येही उत्तम कामगिरी केली होती आणि बारावीच्या या महत्त्वाच्या परीक्षेतही तीच चमक कायम राखली.

साहिबाच्या या उल्लेखनीय यशामुळे उचगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत आहे.