बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव येथील पॅशनेट स्पोर्ट्स अकादमीच्या (पीएसए) जलतरणपटूंनी हासन येथे नुकत्याच पार पडलेल्या जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी करत वर्षाचा दिमाखदार समारोप केला. विविध वयोगटांतील स्पर्धांमध्ये पीएसएच्या खेळाडूंनी एकूण ३९ पदके जिंकत ७५ गुणांसह सांघिक उपविजेतेपद पटकावले.
मिलेनियम स्कूल, हासन येथे झालेल्या या स्पर्धेत पीएसएच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट शिस्त, सांघिक समन्वय आणि स्पर्धात्मक वृत्तीचे दर्शन घडवले. किकबोर्ड, फ्रीस्टाइल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक, बटरफ्लाय तसेच वैयक्तिक मेडले व रिले प्रकारांमध्ये खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरी करत पदकांची लयलूट केली.
गट ७ मधील आकर्ष कल्लर, अविश के. चौगुले व रिशांत कलखांबकर यांनी किकबोर्ड व रिले प्रकारांत पदके पटकावली. गट ५ मधील रित्वी कंग्राळकर हिने फ्रीस्टाइल, बॅकस्ट्रोक आणि बटरफ्लायमध्ये पदके जिंकली. गट ६ मधील शौर्य एस. कुरुंदवाड याने फ्रीस्टाइल, ब्रेस्टस्ट्रोक आणि बटरफ्लायमध्ये रौप्य पदकांची कमाई केली.
गट १ मधील सिद्धार्थ एस. कुरुंदवाड आणि अथर्व प्रशांत पाटील यांनी वैयक्तिक मेडले व रिले प्रकारांत पदके मिळवली. गट २ मधील मोहम्मद साद ए. खाझी आणि पारस कातंबळे यांनी फ्रीस्टाइल, ब्रेस्टस्ट्रोक, बॅकस्ट्रोक व रिले प्रकारांत यश मिळवले. ओम के. पातुकाळे याने १०० मीटर वैयक्तिक मेडले रौप्य, तर ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक व बटरफ्लायमध्ये सुवर्ण पटकावले. यश के. पातुकले आणि सम्राट मलाई यांनीही विविध प्रकारांत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली.
या यशामागे पीएसएचे प्रशिक्षक प्रशांत पाटील, अमित चव्हाण पाटील आणि सूरज मंगणकर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. तसेच केएलई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, केएलई स्कूल, सीबीएएलसी लिंगराज कॉलेज आणि आरएलएस कॉलेजच्या प्राचार्य व व्यवस्थापन मंडळाचे प्रोत्साहन व सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले.








