- निवृत्त शिक्षक एस. आर. मोरे
बिजगर्णी : “शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तर जीवन कसे जगावे हे शिकवते. मातृभाषेतून घेतलेले शिक्षण व्यक्तिमत्त्व घडवते आणि योग्य संस्कारांची बीजे पेरते,” असे निवृत्त शिक्षक एस. आर. मोरे यांनी सांगितले. ते येथे आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रमात बोलत होते.
मोरे पुढे म्हणाले, “मी १९५१ साली या शाळेत शिकलो. त्या काळात शाळेने दिलेले संस्कार आजही माझ्या आयुष्याचा पाया आहेत. शाळा ही आईसमान आहे. दान करणे हेच खरे पुण्यकर्म असून, आपल्याकडील काही इतरांसोबत वाटल्यानेच खरा आनंद मिळतो,” असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सह्याद्री सोसायटीचे चेअरमन पी. पी. बेळगावकर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक पी. के. पाटील यांनी प्रास्ताविक करत मान्यवरांचे स्वागत केले.
दरम्यान, महात्मा गांधी सामाजिक संस्था, कावळेवाडी यांच्यावतीने पी. पी. बेळगावकर यांची दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या सहसचिवपदी झालेल्या नियुक्तीबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. हा सन्मान एस. आर. मोरे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाला वाय. पी. नाईक, पी. आर. गावडे, ह. भ. प. शिवाजी जाधव, पांडुरंग मोरे, सौ. लक्ष्मी जाधव, नीता अष्टेकर, आरती विभूती आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी एस. आर. मोरे यांनी शाळेच्या गरजा लक्षात घेऊन कपाट देणगी देण्याचे जाहीर केले.तसेच कावळेवाडी येथील महात्मा गांधी वाचनालयासाठी पंचवीस हजार रुपयांच्या वाचनयोग्य पुस्तकांचा संच देण्याचे आश्वासन दिले. यावेळी पी. पी. बेळगावकर आणि वाय. पी. नाईक यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. आर. गावडे, प्रास्ताविक पी. के. पाटील, तर आभार प्रदर्शन शिक्षिका तेजस्विनी कांबळे यांनी केले.
