बेळगाव : कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेतर्फे आयोजित १२ व्या सतीश शुगर क्लासिक जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत नेक्स्ट लेव्हल जिमचा प्रशांत खन्नूकर याने आपल्या पिळदार आणि दमदार शरीरयष्टीच्या जोरावर ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा मानाचा किताब पटकावला.
या स्पर्धेत पॉलिहैड्रान जिमचा व्यंकटेश ताशिलदार याने प्रथम उपविजेतेपद, तर लाईफ टाईम जिमचा विशाल चव्हाण याने द्वितीय उपविजेतेपद मिळवले. फ्लॅक्स फिटनेसच्या उमेश गंगणे याने उत्कृष्ट पोझिंगसाठी ‘बेस्ट पोझर’चा किताब आपल्या नावावर केला.
गोकाक येथील वाल्मिकी मैदानावर पार पडलेल्या या जिल्हास्तरीय स्पर्धेत सुमारे ८० शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धकांनी सादर केलेल्या आकर्षक पोझेस आणि फिटनेसने उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धेचे आयोजन व नियोजन यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.








