बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आयोजित गोरल क्लासिक जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत नेक्स्ट लेव्हल जीमच्या प्रशांत खन्नूकर याने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर गोरल क्लासिक मानाचा किताब पटकाविला.तर मंथन जीमच्या किशोर पुजारीने उत्कृष्ट पोझर हा बहुमान मिळविला. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे पुरस्कर्ते माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व हनुमान मूर्तीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सुमारे 125 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
गोरल क्लासिक किताबासाठी केतन भातकांडे, संजय बस्तवाडकर, अवनिश पुजारी, सुनील भातकांडे, प्रताप कालकुंद्रीकर, प्रशांत खन्नूकर, विशाल चव्हाण यांच्यात लढत झाली. त्यानंतर प्रताप कालकुंद्रीकर, प्रशांत खन्नूकर व विशाल चव्हाण यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये प्रशांत खन्नूकरने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर गोरल क्लासिक येळ्ळूर हा मानाचा किताब पटकावला. तर उत्कृष्ट पोझर स्पर्धेत मंथन जीमच्या किशोर पुजारी याने आपल्या उत्कृष्ट पोझिंगद्वारे उत्कृष्ट पोझरचा बहुमान मिळविला.
पुरस्कर्ते रमेश गोरल, अजित सिद्दण्णवर व इतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या प्रशांत खन्नूकरला मानाचा किताब, चषक, प्रमाणपत्र व भेटवस्तू तर किशोर पुजारीला चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. एम. गंगाधर, हेमंत हावळ, प्रकाश पुजारी, राजाराम मजुकर, सुनील पवार, आनंद लंगरकांडे, राजशेखर चव्हाण, आकाश हुलीयार, नूरमुल्ला, सुनील अष्टेकर, गजानन हंगिरगेकर, सुनील राऊत यांनी काम पाहिले.








