विजयपूर / प्रतिनिधी

विजापूर जिल्ह्यातील चडचण शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेवरील मोठ्या दरोड्याच्या तपासात पोलिसांना महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. दरोडेखोरांनी लपवून ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हुलजंती गावातील एका जुन्या घराच्या छतावर ठेवलेल्या बॅगेतून जप्त करण्यात आले.

माहितीनुसार, एका दरोडेखोराने चोरीचा माल असलेली बॅग घराच्या छतावर ठेवून पलायन केले होते. स्थानिक रहिवाशांच्या लक्षात ही बॅग आल्यावर त्यांनी लगेचच महाराष्ट्रातील मंगळवेढा पोलिसांना याबाबत कळवले. मंगळवेढा पोलिसांनी विजापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने ती बॅग ताब्यात घेऊन तपास सुरू केला.

पोलीस अधीक्षक निंबरगी यांनी सांगितले की, “या बॅगेतून ६.५५ किलो वजनाचे सोन्याचे दागिने आणि ४१.४ लाख रुपयांची रोकड मिळाली. या दागिन्यांचे १३६ छोटे पॅकेट्स होते. बँकेतून एकूण १.४ कोटी रुपये किंमतीचे जवळपास २० किलो सोने लुटले गेले होते. त्यापैकी २१ पॅकेट्समधील दागिने आणि १.३० लाख रुपये रोख आम्हाला सापडले आहेत.”

ते पुढे म्हणाले, “१६ सप्टेंबर रोजी दरोड्याच्या दिवशीच दरोडेखोरांनी वापरलेली इको गाडी हुलजंती परिसरात सापडली होती. या गाडीने एका दुचाकीला धडक दिल्यानंतर गाडीतून उतरलेल्या आरोपीने पिस्तूल दाखवत पळ काढला. पळताना त्यानेच सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली बॅग एका घराच्या छतावर ठेवून दिली होती.”

निंबरगी यांनी सांगितले की, “या प्रकरणाचा तपास आमच्या आठ पथकांकडून वेगवेगळ्या दिशांनी सुरू आहे. लवकरच संपूर्ण दरोडा उघडकीस येईल आणि आरोपींना अटक केली जाईल.”