- तिघांवर गुन्हे दाखल
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहर पोलिसांनी गुरुवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या स्वतंत्र धडक कारवाईत मादक पदार्थांचे सेवन आणि बेकायदेशीर मटका जुगार याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, एक आरोपी अद्याप फरार आहे.
रुक्मिणीनगर, ५ व्या क्रॉसनजीक माळमारुती पोलिसांनी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या आनंद मारुती नाईक (वय ३६) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीत त्याने मादक पदार्थ (गांजा) सेवन केल्याचे निष्पन्न झाले. पीएसआय होन्नप्पा तळवार यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
दुसऱ्या कारवाईत हिरेबागेवाडी-बससापूर रोड परिसरातील सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पीएसआय बसवराज मिटगर आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला. या वेळी उल्लेश मडीवाळ कुरबर याला जुगार खेळताना ताब्यात घेण्यात आले, तर त्याच्यासोबतचा अहिरुद्दिन इमामसाब नेसरगी हा आरोपी पळून गेला. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले असून, पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी संबंधित पीएसआय आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.








