बेळगाव / प्रतिनिधी
येत्या १ नोव्हेंबर रोजीच्या कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात पुन्हा एकदा मराठी कार्यकर्त्यांवर पोलिसी दडपशाहीचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे, मालोजीराव अष्टेकर आणि मनोहर किणेकर यांना खबरदारीच्या नोटीसा बजावल्याने मराठी समाजात संताप व्यक्त होत आहे.
ही नोटीस मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी दाखल केलेल्या अहवालावरून देण्यात आली असून, अहवालात नमूद करण्यात आले आहे की हे तिचे मध्यवर्ती समितीचे नेते धर्मवीर संभाजी उद्यानातून सायकल रॅली काढून आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. या आधी २०२३ – २४ मध्येही अशा प्रकारे रॅली काढल्याचा उल्लेख पोलिसांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसानी भारतीय नागरी सुरक्षा अधिनियम कलम १२६ नुसार एक वर्षाच्या कालावधीसाठी पाच लाख रुपयाची वैयक्तिक हमी आणि दोन जामीनदारांची हमी सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, सोमवारी या तिन्ही मराठी नेत्यांनी व सोबत एम. जी. पाटील, नेताजी जाधव, रणजीत चव्हाण पाटील यांनी बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन १ नोव्हेंबर रोजी काळा दिन शांततेत पाळण्याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर लगेचच सायंकाळी पोलिसांनी या तिघांनाच खबरदारीच्या नोटीसा पाठवल्या, यामुळे मराठी संघटनांमध्ये रोषाची लाट उसळली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते म्हणाले की, “मराठी जनतेला दडपण्यासाठी प्रत्येक वर्षी राज्योत्सवाच्या आधी अशा प्रकारच्या नोटीसा देऊन धमकावण्याचे काम केले जाते. आम्ही नेहमी शांततेत आंदोलन केले आहे, तरीही पोलिस प्रशासन मराठी आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.” राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा बेळगावात मराठी विरुद्ध कन्नड तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, मराठी संघटनांनी या कारवाईचा निषेध केला आहे.









