बेळगाव / प्रतिनिधी

गणेशोत्सव उत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना, बेळगाव पोलिस आणि महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या सदस्यांसह गणेशोत्सव मिरवणूक मार्गाची पाहणी केली.

गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान गणेशमूर्ती आणताना जनतेला त्रास होऊ नये यासाठी बेळगाव पोलिस आयुक्त भूषण बोरसे आणि महापालिकेच्या आयुक्त शुभा बी. यांनी सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या सदस्यांसह मिरवणूक मार्गाची पाहणी केली. प्रारंभी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल पासून पाहणीला सुरुवात करून काकतीवेस रोड, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंगखिंड गल्ली आणि कपिलेश्वर मार्ग येथे पाहणी दौऱ्याची सांगता करण्यात आली. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर अधिकाऱ्यांनी चर्चा केली.

या पाहणी दौऱ्यावेळी रस्ते सुरळीत आहेत की काही अडथळे आहेत? आणि सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित आहे का ? रस्त्यांवरील खड्डे, विजेच्या तारांमधील समस्या आणि पाण्याच्या व्यवस्थेची तपासणी करून मिरवणूक सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी शक्य ते सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. या पाहणीनंतर अधिकाऱ्यांचे पथक अहवाल तयार करेल आणि आवश्यक ती पावले जलदगतीने उचलेल, असे पोलीस आयुक्तांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळी कायदा – सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमणी, वाहतूक आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्यासह मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी, कार्यवाह गणेश दड्डीकर, सिद्धार्थ भातकांडे, हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता मनोहर सुतार यांच्यासह महापालिका, वनविभाग आणि हेस्कॉमचे पदाधिकारी उपस्थित होते.