• वेगवेगळ्या पाच प्रकरणातील नऊ आरोपी गजाआड
  • एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी बेळगाव पोलिसांनी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत हेरॉईन आणि गांजाची तस्करी करणाऱ्या एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल १ लाख ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थांच्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.

बेळगावात अंमली पदार्थ विकले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन ठिकाणी स्वतंत्रपणे कारवाई केली. महाद्वार रोडवरील संभाजी गल्लीमध्ये मार्केट पोलीस स्टेशनचे पीएसआय शशिकांत कुरळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकला. सार्वजनिक ठिकाणी हेरॉईन विकणाऱ्या वैभव कुरणे आणि ओंकार जोशी या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १८ हजार रुपये किमतीचे २४.८१ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.

दुसरीकडे, मच्छे येथील साई कॉलनीमध्ये गांजा विकणाऱ्या अतिफ मुल्ला आणि सैफअली माडीवाले यांना ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीआय नंदीश्वर कुंभार यांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ४० हजार रुपये किमतीचा १ किलो ३६६ ग्रॅम गांजा, रोख १ हजार रुपये, एक आयफोन आणि एक दुचाकी, असा एकूण १ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बेळगाव पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्तांनी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.