बेळगाव / प्रतिनिधी

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे सीमाभाग अध्यक्ष शुभम शेळके यांच्यासोबत घेतल्याचे सेल्फी प्रकरण पोलीस निरीक्षकाच्या अंगलट आले. या प्रकारामुळे माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी बी. आर. गडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते शुभम शेळके यांच्यासोबत पोलीस निरीक्षक कालीमिर्ची यांनी घेतलेला सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या घटनेनंतर कर्नाटकातील विविध कन्नड संघटनांनी कालीमिर्ची यांच्या विरोधात निदर्शने केली होती. या प्रकरणानंतर अखेर त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले असून, ही कारवाई त्या सेल्फी प्रकरणाशी संबंधित असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात जोरात सुरू आहे.