बेळगाव / प्रतिनिधी

शिवाजीनगर बेळगाव येथील सरकारी शाळा क्र. २७ मधील गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. बेळगाव उत्तर विभाग नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे पोलीस अधीक्षक (एसपी) रवींद्र के. गडादी यांच्या सहकार्यातून फेसबुक फ्रेंड्स सर्कलतर्फे आज सोमवारी सकाळी हा कार्यक्रम पार पडला.

बेळगाव शिवाजीनगर येथील सरकारी मराठी शाळा क्रमांक २७ च्या मुख्याध्यापिका वंदना देसाई यांनी नुकतीच शाळेतील विद्यार्थी – विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य पुरविण्यासाठी फेसबुक फ्रेंड्स सर्कलकडे मदतीची विनंती केली होती. या संदर्भात त्यांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर यांना पत्र पाठवून संपर्क साधला होता. त्यांनी केलेल्या विनंतीनुसार तातडीची गरज ओळखून संतोष दरेकर यांनी आयपीएस रवींद्र गडादी पोलिस अधीक्षक, नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालय, उत्तर विभाग, बेळगाव यांच्याशी संपर्क साधला त्यांनी देखील विलंब न करता प्रतिसाद दिला आणि शिवाजीनगर शाळेतील विद्यार्थी – विद्यार्थिनी आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीमला आपल्या कार्यालयात आमंत्रित करून शालेय मुलांसाठी शैक्षणिक साहित्याची व्यवस्था करण्याद्वारे सहकार्य केले. यामध्ये चार वह्या, एक गणिताचे पुस्तक, चित्रकला वही, स्केच पेनचे पॅकेट, पेन्सिल, पेन आणि खोडरबर यांचा समावेश होता.

पोलीस अधीक्षक रवींद्र के. गडादी यांनी शैक्षणिक साहित्याचे वितरण करून सरकारी शाळा क्र. २७ मधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे कौतुक केले आणि मुलांसाठी आवश्यक असलेली कोणतीही मदत त्यांच्याकडून केली जाईल असे आश्वासन दिले. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सीआरपी शालिवान, मुख्याध्यापिका श्रीमती वंदना देसाई, शिक्षिका अर्चना नाईक, फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर, संतोष होसमणी आदी उपस्थित होते.