नवी दिल्ली : छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात आज झालेल्या गंभीर रेल्वे दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते. कोरोबा पॅसेंजर ट्रेनची एका मालगाडीशी जोरदार धडक झाल्याने मोठी हानी झाली असून अनेक प्रवासी जखमी आहेत. ही दुर्घटना बिलासपूर–कटनी मार्गावरील लाल खदान परिसरात घडली.
अपघाताची माहिती मिळताच रेल्वे विभागाचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. मोठा अपघात घडल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली. दुपारी सुमारे चारच्या सुमारास ट्रेन क्रमांक ६८७३३ ही मालगाडीस धडकली. धडक इतकी तीव्र होती की ओव्हरहेड वायर आणि सिग्नल प्रणालीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यासाठी काही तास लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्रीपर्यंत संबंधित रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत राहू शकते, असे संकेत दिले जात आहेत.








