• ५.५ किमी स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक

सुळगा (हिं.) / वार्ताहर

सेंट पॉल्स हायस्कूल, कॅम्प (बेळगाव) येथे जयभारत फाउंडेशनच्या सहकार्याने रविवारी दि. ११ जानेवारी २०२६ रोजी ‘पर्यावरण रन – गो ग्रीन मॅरेथॉन २०२६’ (द्वितीय आवृत्ती) उत्साहात पार पडली. ग्रीन सिटी, क्लीन सिटी – लेट्स रन फॉर अवर ड्रीम सिटी या संकल्पनेखाली आयोजित या मॅरेथॉनमध्ये विविध वयोगटातील १० हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

या स्पर्धेत सुळगा (हिं.) येथील सेंट फ्रान्सिस डी-सेल्स स्कूल मध्ये इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या कु.अथर्व अजित कलखांबकर याने १० वर्षांखालील वयोगटातील ५.५ किमी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. अथर्वच्या या यशाबद्दल शिक्षक, पालक आणि परिसरातील नागरिकांनी त्याचे कौतुक केले. खेळाची प्रचंड आवड असलेल्या अथर्वने आपल्या जिद्द, मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर हे उज्ज्वल यश मिळवले आहे.

या मॅरेथॉन स्पर्धेनंतर सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट, पदक आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. शाळेच्या प्रशासनाने तसेच स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

या मॅरेथॉन स्पर्धेचा उद्देश केवळ शारीरिक तंदुरुस्ती वाढवणे नाही तर शहरात स्वच्छता आणि हरित वातावरण याबद्दल जनजागृती करणे असा होता. कार्यक्रमाने स्थानिक समाजात पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या संदेशाला प्रोत्साहन दिले आहे.