बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या परवाना नूतनीकरण प्रक्रियेला अचानक स्थगिती देण्यात आल्याने अभियंत्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. सरकारच्या नव्या नियमांमुळे उद्भवलेल्या अडचणींचा निषेध करत माजी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली आज अपर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.
माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली अभियंत्यांचे शिष्टमंडळ अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांना भेटले. शासनाच्या नव्या कायद्यानुसार परवाना नूतनीकरण प्रक्रिया थांबवण्यात आली असून, नूतनीकरणासाठी २०-३० वर्षांपूर्वीची शालेय कागदपत्रे सादर करण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे दीर्घकाळ सेवा देणाऱ्या ज्येष्ठ अभियंत्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
याशिवाय डिप्लोमा आणि जेओसी धारक अभियंत्यांच्या कामाची मर्यादा केवळ १००० चौरस फूटांपर्यंत निश्चित करण्यात आल्याने अभियंत्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
निवेदनानंतर पत्रकारांशी बोलताना विनायक गुंजटकर यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर कठोर टीका केली. “अ” आणि “ब” खात्याशी संबंधित २०२४ पूर्वीच्या इमारती नियमानुसार समाविष्ट कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. तसेच महानगरपालिकेत कार्यरत प्लंबरकडून शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे मागण्याचा निर्णय अव्यवहार्य असल्याचे सांगत, अल्पशिक्षित कामगारांनी अशी कागदपत्रे कुठून आणायची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अपर जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या वेळी बेळगाव महानगरपालिकेतील शेकडो अभियंते व संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








