बेळगाव : होळी सणानिमित्त पांगुळ गल्लीतील श्री अश्वत्थामा मंदिर येथे होणाऱ्या पारंपारिक कार्यक्रमाच्या वेळापत्रकात चंद्रग्रहणामुळे बदल करण्यात आला आहे. पारंपारिक जाहीर लोटांगणाचा कार्यक्रम मंगळवार, दि. ३ मार्च रोजी सकाळी ८.३० ते १०.३० या वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पांगुळ गल्ली पंच कमिटी व श्री अश्वत्थामा युवक मंडळाने दिली.

माहितीनुसार, सोमवार दि. २ मार्च २०२६ रोजी रात्री १० वाजता होळी आणणे व पळवण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर मंगळवारी पहाटे ५.३० वाजता होळी व होळी धनाची पूजा केली जाईल. चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी होणारे काही कार्यक्रम सकाळी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोटांगणाचा कार्यक्रम श्री गणपती मंदिरापासून सुरू होऊन ठरलेल्या वेळेत पूर्ण केला जाईल. देवालयाची पूजा ग्रहण संपल्यानंतर सायंकाळी ७ वाजता करण्यात येईल. त्यानंतर श्रीफळ वाढविण्याचा कार्यक्रम होणार आहे.

दरम्यान, होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्केट पोलिस ठाण्यात पोलिस प्रशासनाने पंच कमिटी व युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक मार्गदर्शन केले. बैठकीनंतर पंच कमिटीतर्फे सतीश परशराम अनगोळकर यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना चंद्रग्रहणामुळे वेळेत बदल करण्यात आल्याचे स्पष्ट केले. सर्व भक्त व नागरिकांनी बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.