• एकाच रात्रीत तीन दुकाने फोडून माल – रोकड लांबविली
  • परिसरात खळबळ

बेळगाव / प्रतिनिधी

चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र पोलिसांच्या या प्रयत्नांना चोरट्यांनी पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील पांगुळ गल्ली परिसरात बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी तीन व्यापारिक दुकानांची शटर उचकटून रोख रक्कम तसेच किमती मालावर डल्ला मारून पोबारा केला.आज बुधवार दि. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली.

महिलांच्या बॅगा व अ‍ॅक्सेसरीज विक्रीच्या दुकानासह दोन वस्त्रदुकानांमध्ये घुसून चोरट्यांनी रोख रक्कम आणि किमती साहित्याची चोरी केली. घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून बॅटरीच्या प्रकाशात चोरटा मालाची शोधाशोध करत असल्याचे स्पष्ट दिसते.

घटनेची माहिती मिळताच खडेबाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. या चोरीमुळे शहरातील व्यापारी वर्गात चिंता वाढली असून, पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. व्यावसायिक परिसरात सातत्याने वाढणाऱ्या चोरीमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.