बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव तालुक्यातील कोंडुसकोप्प गावातील अनेक शेतकऱ्यांनी उत्तर कर्नाटकातील सुवर्णसौध आणि राष्ट्रीय महामार्ग निर्मितीसाठी आपल्या शेतजमिनी दिल्या आहेत ; मात्र त्यांच्याच मुलांना बसची सुविधा मिळत नसल्याने रोज त्रास सहन करावा लागत आहे. आज सकाळी विद्यार्थ्यांनी गावात महामार्ग रोखून आंदोलन केले. त्यानंतर शाळेत न जाता थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन “आम्हाला बस हवीच!” अशा घोषणा देत तीव्र निदर्शने केली.

कोंडुसकोप्प गावातील शेतकऱ्यांनी सुवर्णसौध आणि राष्ट्रीय महामार्ग उभारणीसाठी आपल्या जमिनी दिल्या. परंतु  या गावातील विद्यार्थ्यांना बसची सोय नसल्याने शैक्षणिक नुकसान सोसावे लागत आहे. आज कोंडुसकोप्पजवळ महामार्ग रोखून विद्यार्थ्यांनी बससाठी आंदोलन केले. परिणामी  तासाभरासाठी वाहतूक ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच हिरेबागवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बसची समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आणि मुलांना बसमध्ये बसवून शाळेत पाठवले.

मात्र, बसने शाळेत न जाता विद्यार्थी थेट बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांनी बसच्या कमतरतेविरुद्ध आणि शैक्षणिक नुकसानीविरोधात घोषणा देत आपला तीव्र असंतोष व्यक्त केला. शालेय विद्यार्थ्यांनी स्वतः निवेदन लिहून जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

कोंडुसकोप्प गावातून बस एक-दोन किलोमीटर बाहेर उतरवून जाते. पाऊस असो की ऊन, विद्यार्थ्यांना चालत जावे लागते. बसमध्ये प्रचंड गर्दी असते. यामुळे आपल्या गावासाठी बससुविधा पुरविण्यात यावी, अशी मागणी उपस्थित विद्यार्थ्यांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते.