• ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांचे प्रतिपादन

बेळगाव / प्रतिनिधी

स्पर्धात्मक आणि वेगाने बदलणाऱ्या जगात यशस्वी होण्यासाठी निरंतर शिकत राहणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षण एकदा हातून सुटले की ते पुन्हा मिळवणे कठीण होते, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी केले.

कॅम्प येथील बी.के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी महोत्सव सप्ताहात बुधवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार राजू शेठ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सचिन पिळगावकर म्हणाले की, माझे बालपण गरिबीत गेले. लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी लागली आणि त्यामुळे उच्च शिक्षण पूर्ण करता आले नाही. मात्र शिक्षकांनी माझ्या शिक्षणासाठी विशेष मेहनत घेतली. शिक्षणाचे महत्त्व मला आयुष्यभर जाणवत राहिले. त्यामुळे प्रत्येकाने वय, परिस्थिती किंवा व्यवसाय काहीही असो, शिकणे कधीही थांबवू नये.

चित्रपटसृष्टीबद्दल बोलताना ते म्हणाले की, लोकांना या क्षेत्रातील झगमगाट दिसतो ; मात्र त्यामागील कष्ट, शिस्त आणि सतत शिकण्याची गरज दिसत नाही. मी अभिनय करत असतानाच भाषांचे ज्ञान, दिग्दर्शन आणि तांत्रिक बाबी शिकत राहिलो. मीनाकुमारी यांच्यामुळे मला उर्दू शिकण्याची संधी मिळाली. भाषा आणि ज्ञानावरचे प्रेम मला आजही पुढे नेत आहे.

स्त्री शिक्षणावर भर देत ते म्हणाले की, स्त्रिया सर्वार्थाने सक्षम असून पालकांनी मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे. योग्य वयात योग्य गोष्टी शिकणे आणि स्वतःला सतत समृद्ध करणे हाच यशाचा खरा मार्ग आहे.

आमदार राजू शेठ यांनी शाळेच्या शताब्दी महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षक समाज घडविण्याचे आणि राष्ट्र उभारणीचे कार्य करतात, असे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी मान्यवरांचे स्वागत केले.