• संशयित महिलेला नागरिकांनी चोपले

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील न्यू गांधीनगर भागात दीड वर्षांच्या बालकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न स्थानिक नागरिकांनी उधळून लावल्याची घटना घडली. संशयित महिलेला नागरिकांनी पकडून मारहाण केल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

माहितीनुसार, घरासमोर खेळत असलेल्या बालकाला एका महिलेने पिशवीत घालून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ धाव घेऊन महिलेला पकडले. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच माळ मारुती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक बी.आर.गड्डेकर यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत संबंधित महिलेला ताब्यात घेतले.

ही महिला नेमकी कोण आहे, तिच्यामागे आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच बालकांच्या अपहरणाशी संबंधित कोणती टोळी कार्यरत आहे का, याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. यापूर्वी फुलबाग गल्ली व अनगोळ परिसरातही अशा प्रकारच्या घटनांची चर्चा असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सुट्टीच्या काळात घराजवळ खेळणाऱ्या लहान मुलांवर पालकांनी विशेष लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परिसरात बालकांच्या अपहरणाचा प्रयत्न करणारी टोळी सक्रिय असण्याची शक्यता व्यक्त होत असून नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.