बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील न्यू गांधी नगर परिसरात शुक्रवारी पूर्ववैमनस्यातून दिशांत चावूस या तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. मुजम्मील नावाच्या एका आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती असून, तो एका जुन्या खुनाच्या प्रकरणात उच्च न्यायालयातून जामीन मिळवून अलीकडेच बाहेर आला होता.

जखमी दिशांत चावूस हा न्यू गांधी नगर परिसरातील रहिवासी आहे. शुक्रवारी दुपारी त्याचा मुजम्मीलशी अचानक सामना झाला. जुना राग मनात धरून आरोपीने ‘तू माझ्याकडे रागाने का पाहतोस’ असे म्हणत दिशांतवर अचानक चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात दिशांतच्या छातीवर चाकूचा खोल वार झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने जखमी दिशांतला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र जखम गंभीर असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असून सध्या अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच माळमारुती पोलीस ठाण्याचे सीपीआय बी. आर. गड्डेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली असून पुढील तपास सुरू आहे.