सुळगे (ये.) : येथील नेताजी हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुवंदन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. गुरुपौर्णिमा दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी – विद्यार्थिनींच्याहस्ते मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा गुलाबपुष्प व पेन देऊन यथोचित्त गौरव करण्यात आला.

यानंतर शाळेच्या विद्यार्थिनी कु. सेजल मधुकर थोरवत व कु. श्रृती भाऊराव होणगेकर यांनी मनोगत व्यक्त केले. तर समाजविज्ञान विषयतज्ञ एम.पी. कंग्राळकर यांनी आपल्या भाषणातून महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार होते. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि तिची जोपासना महर्षी व्यासांनीच केली आहे. पूर्वी वेद हा एकच होता ऋषिव्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन करून त्याचे संपादन केल्याची माहिती दिली.

कन्नड विषय शिक्षकएस.एस. केंगेरी यांनी मनोगतामध्ये जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपण एखादा तरी गुरु करावा असे म्हणतात आणि त्या गुरु बद्दल प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय असे सांगितले.

अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक टी. वाय. भोगण यांनी परशुराम आणि कर्ण (गुरु आणि शिष्य) यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.प्रिया श्रीकांत पाटील हिने तर आभार कु. करुणा रमेश गडकरी हिने मानले. या कार्यक्रमाला नेताजी हायस्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.