• मान्यवरांचे मार्गदर्शन ; विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा

सुळगे (ये.) : येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित नेताजी हायस्कूल सुळगे (ये.) येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित सदिच्छा समारंभ व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांना आगामी परीक्षांसाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा मंडळाचे ज्येष्ठ सदस्य आर. एस. नंद्याळकर होते. व्यासपीठावर प्रमुख वक्ते पी. जी. पाटील, शाळा सुधारणा मंडळाचे अध्यक्ष बी. बी. पाटील, उपाध्यक्ष भाऊराव होनगेकर, एन. आर. पाटील, पांडुरंग कोळशेकर, तसेच सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील आणि प्रभाकर नावगेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटोपूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. हायस्कूलचे मुख्याध्यापक टी. वाय. भोगण यांनी प्रास्ताविकातून उपस्थितांचे स्वागत करून दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

या वेळी विद्यार्थिनी प्रिया श्रीकांत पाटील, करुणा रमेश गडकरी आणि सेजल मधुकर थोरवत यांनी मनोगत व्यक्त करत शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांच्या वतीने आर. एस. कंग्राळकर यांनी मार्गदर्शन केले, तर सहशिक्षक एम. पी. कंग्राळकर यांनी स्वलिखित कविता सादर केल्या. यानंतर ए. बी. पाटील यांनी पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर करून मान्यवरांच्या हस्ते त्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. प्रमुख वक्ते पी. जी. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवून आदर्श नागरिक बनावे, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात बी. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे आणि ताणतणाव न घेता धैर्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असा मोलाचा सल्ला दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. वाय. व्हंडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन जे. जे. पाटील यांनी मानले.