बेळगाव / प्रतिनिधी
नव्या वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक नियमावली जाहीर केली आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिला आहे.
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान घातक शस्त्रे बाळगणे, मद्यपान करून वाहन चालवणे तसेच अमली पदार्थांचे सेवन यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करून १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.
शहरात सुमारे १००० पोलीस कर्मचारी, केएसआरपी व होमगार्डच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून नागरिकांच्या मदतीसाठी २० विशेष हेल्प डेस्क सुरू करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही व ड्रोनद्वारे शहरावर सतत पाळत ठेवली जाणार आहे.
हॉटेल व बार मालकांना अल्पवयीन मुलांना मद्यविक्री न करण्याच्या तसेच बार रात्री १ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या ‘ओल्ड मॅन’ दहनासाठी अग्निशमन दलाची पूर्वपरवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.
दरम्यान, ‘ओल्ड मॅन’ दहनाच्या परंपरेमुळे कॅम्प परिसरात बाजारपेठेत मोठी चैतन्याची लाट दिसून येत आहे. विविध आकारांच्या प्रतिकृतींची खरेदी करण्यासाठी स्थानिकांसह शेजारील गोवा राज्यातूनही नागरिक दाखल झाले आहेत. रात्री ठीक १२ वाजता ‘ओल्ड मॅन’ दहन करून बेळगावकर आगळ्यावेगळ्या पद्धतीने नव्या वर्षात पदार्पण करणार आहेत.
नागरिकांनी नियमांचे पालन करून सुरक्षित आणि आनंदी वातावरणात नवीन वर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.








