- खेळांमुळे फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक सामाजिक विकासास मदत : अभिनव जैन
बेळगाव : राष्ट्रीय क्रीडा दिन देशाचे महान हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. खेळांना आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. खेळांमुळे आपला फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक व सामाजिक विकास होण्यास मदत मिळते असे विचार व्यक्त करून राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज आयोजित आंतर शालेय हॉकी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. स्पर्धेमध्ये जय, पराजय महत्त्वाचा नसतो तर स्पर्धेत भाग घेणे महत्त्वाचे असते, असे प्रमुख पाहुणे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अभिनव जैन यांनी आपल्या समयोचित भाषणात स्पष्ट केले.
टिळकवाडी येथील नेताजी सुभाष चंद्र बोस लेले मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास बेळगावचे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अभिनव जैन, जिल्हा युवा सक्षमीकरण व क्रीडा खात्याचे (डीवायईएस) उपसंचालक बी. श्रीनिवास आणि गटशिक्षण खात्याच्या शारीरिक शिक्षण अधिकारी श्रीमती जे. बी. पटेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हॉकी बेळगाव संघटनेचे अध्यक्ष गुळाप्पा होसमणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक झाल्यानंतर प्रमुख पाहुणे अभिनव जैन यांच्या हस्ते हॉकीचे जादूगार दिवंगत मेजर ध्यानचंद आणि बेळगावचे ऑलंपियन हॉकी खेळाडू बंडू पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आयोजकांतर्फे प्रमुख पाहुण्यांचा शाल घालून व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
प्रारंभी प्रकाश कालकुंद्रीकर यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचा व मेजर ध्यानचंद ट्रॉफी यांचा हॉकी जगतातील इतिहास सांगितला व पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी सुमारे 25 मुला मुलींच्या हॉकी संघांनी मेजर ध्यानचंद ट्रॉफी मध्ये सहभाग घेतला होता. हॉकी बेळगाव संघटना, बेळगाव जिल्हा युवा सक्षमीकरण व क्रीडा खाते आणि गटशिक्षण खाते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिन आज शुक्रवारी सकाळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अभिनव जैन, जिल्हा युवजन अधिकारी बी श्रीनिवास, हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, जय भारत फाउंडेशनचे बसवराज पाटील, दत्तात्रय जाधव, संजय शिंदे, मनोहर पाटील, गणपत गावडे, प्रकाश बिळगोजी, नामदेव सावंत, श्रीकांत आजगावकर, अश्विनी बस्तवाडकर, आशा होसमनी, सविता हेब्बार, सविता वेसणे, एस. एस.नरगोदी, गोपाळ खांडे, साकीब बेपारी, संदीप पाटील, प्रवीण पाटील, कल्लाप्पा हगीदळे आदी उपस्थित होते. शेवटी दत्तात्रय जाधव यांनी आभार मानले.