बेळगाव / प्रतिनिधी

महापौर मंगेश पवार व नगरसेवक जयंत जाधव यांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी (ता. २२) बंगळूर उच्च न्यायालयात होणार आहे. शुक्रवारच्या सुनावणीवेळी तरी या प्रकरणी न्यायालयाकडून निर्णय दिला जाणार का? याबाबत उत्सुकता आहे.

या दाव्याची सुनावणी चारवेळा लांबणीवर पडली आहे. या दाव्याच्या सुनावणीवेळी राज्य शासनाचे वकील हजर न राहिल्यानेच सुनावणी लांबणीवर टाकण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला होता. महापौर पवार व नगरसेवक जाधव यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय जून महिन्यात नगरविकास खात्याच्या सचिव दीपा चोळण यांनी दिला होता. त्या निर्णयाच्या विरोधात दोहोंनी बंगळूर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. जुलै महिन्यात झालेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाकडून सचिव दीपा चोळण यांच्या निर्णयाला अंतरीम स्थगिती दिली. या दाव्याचा निकाल जुलै महिन्यातच दिला जाईल, अशी चर्चा होती; पण प्रतिवादी असलेल्या राज्य शासनाकडून लेखी हरकत दाखल करण्यास विलंब झाल्याने अद्याप निकाल देण्यात आलेला नाही. या दाव्यात सामाजिक कार्यकर्ते व खाऊ कट्टा प्रकरणातील तक्रारदार सुजित मुळगुंद यांनाही प्रतिवादी करण्यात आले- आहे. मुळगुंद यांच्या वतीने लेखी हरकत- दाखल करण्यात आली आहे. शुक्रवारी या दाव्यात निर्णय होणार की पुन्हा. सुनावणी लांबणीवर पडणार, याबाबत उत्सुकता आहे.