• धारदार शस्त्राचा वापर : मृतदेह टाकला ओढ्यात

निपाणी / प्रतिनिधी

इचलकरंजी येथील युवकाचा निपाणी जवळील अर्जुननगर (ता. कागल) येथील एका महाविद्यालयाच्या मागील बाजूस निर्जन स्थळी युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे. नंतर सदरचा मृतदेह येथील निकम ओढ्यामध्ये फेकून दिल्याची घटना शनिवारी (ता.६) पहाटे उघडकीस आली आहे. सुहास थोरात (वय २१ रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे निपाणी परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी सुहास थोरात आपल्या मित्रांसह निपाणी येथे चारचाकी वाहन पाहण्याच्या हेतूने आला होता. नंतर कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवरील जवाहर तलावाजवळील निर्मनुष्य भागात त्यांच्यात मद्यप्राशन सुरू होते. याचदरम्यान मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हिसक्यात होऊन धारदार हत्यारांनी सुहासच्या डोके व मानेवर वार करण्यात आले. प्राण गमावल्यानंतर त्याचा मृतदेह शेजारील ओढ्यात फेकून देण्यात आला.

शनिवारी सकाळी अर्जुनी (ता. कागल) येथील पोलीस पाटील दिगंबर कांबळे यांनी ओढ्यात एक मृतदेह तरंगताना पाहून मुरगुड पोलिसांना कळविले. तत्काळ पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देत नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. पंचनामा करून शरीरावर झालेल्या जखमांवरून खून झाल्याची पुष्टी करण्यात आली.

या प्रकरणाचा तपास मुरगुड पोलिसांसह इचलकरंजी शिवाजीनगर पोलीस चालवत आहेत. घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान कोल्हापूर फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल होऊन रक्ताचे नमुने व आवश्यक पुरावे गोळा केले. यामुळे गुन्हेगारांचा शोध लागण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

अर्जुननगर परिसर सायंकाळी निर्जन होत असल्याने अवैध धंद्यांना व झालेखोरांना ऊत येतो. या निर्मनुष्य जागेचाच गैरफायदा घेत मारेकऱ्यांनी खून केला असल्याची चर्चा सुरू आहे.