बेळगाव / प्रतिनिधी
आठ वर्षांच्या प्रेमसंबंधातून जन्मलेल्या नवजात बालकाची बापानेच हत्या केल्याची धक्कादायक घटना कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी गावात उघडकीस आली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी या बालकाचा मृतदेह कचऱ्याच्या कुंडीत फेकण्यात आला होता. पोलिसांनी प्रियकर आणि प्रेयसी दोघांनाही अटक केली आहे. अंबडगट्टी गावातील महाबळेश कामाजी (वय ३१) आणि सिमरन माणिक बाई (वय २२) हे गेल्या आठ वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. या काळात त्यांच्यात अनेकदा शारीरिक संबंध झाले आणि परिणामी सिमरन गर्भवती राहिली.
गेल्या वीस दिवसांपूर्वी सिमरनने आपल्या घरात स्वतःच प्रसूती केली. नवजात बाळ जन्मताच तिने ते प्रियकर महाबळेश याच्या हवाली केले. मात्र समाजाच्या आणि बदनामीच्या भीतीने महाबळेशनेच स्वतःच्या मुलाचा गळा घोटून निर्दयी हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी बाळाचा मृतदेह कचऱ्याच्या कुंडीत फेकून दिला. या संदर्भातील माहिती जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.








