- संशयित आरोपी संतोष जाधव याला अटक
बेळगाव / प्रतिनिधी
सदाशिव नगरातील धक्कादायक कोणाचा छडा पोलिसांनी केवळ पाच तासांत लावला. महादेवी बागप्पा करिन्नावर (वय ४२, रा. सदाशिवनगर पहिला क्रॉस बेळगाव) असे निर्घृण झालेल्या महिलेचे नाव आहे. मंगळवारी रात्री स्थानिक मेस मध्ये स्वयंपाकाचे काम संपवून त्या घरी जात होत्या त्यांना वाटेतच अडवून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी संशयित आरोपी संतोष थावरू जाधव वय ३८, रा. श्रीनगर,बेळगाव) याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी सांगितले, मृत महिला महादेवी हिची दीड वर्षांपूर्वी त्याच्याशी ओळख झाली होती. या कालावधीत संतोष याने महादेवी कडे १० हजार रुपये उसने घेतले होते. यातून दोघांमध्ये अनेकदा वादही झाला. या भांडणातून खून करण्यात आला.
५ ऑगस्ट रोजी रात्री ११.०९ वाजता सदाशिव नगरातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ आरोपी व महादेवी यांच्यात पुन्हा वाद झाला. संतोषने रागाच्या भरात लोखंडी रॉडने तिच्या डोक्यावर वार करत तिचा जागीच खून केला. या घटनेनंतर आरोपी तात्काळ पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस (उपायुक्त कायदा व सुव्यवस्था) नारायण बरमनी यांच्या देखरेखीखाली मोठी शोध मोहीम राबवण्यात आली. मार्केट पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस उपायुक्त संतोष सत्यनायक यांच्या नेतृत्वाखाली एपीएमसी पोलीस स्थानकाचे निरीक्षक यू.एस. आवटी आणि माळमारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी स्वतंत्र पथके तयार करत आरोपीचा शोध सुरू केला. फक्त पाच तासांत पोलिसांनी आरोपी संतोष जाधवला बेळगावात वीरभद्र नगरात अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून खून करण्यासाठी वापरलेला लोखंडी रॉड जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस उपनिरीक्षक एस आर मुत्तट्टी, पोलीस उपनिरीक्षक होन्नप्पा तळवार, पोलीस उपनिरीक्षक हुसेन केरूर तसेच एपीएमसी, माळमारुती आणि मार्केट पोलीस स्थानकाचे कर्मचारी सहभागी झाले. या पथकाचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांनी कौतुक केले आहे.