• अलार्ममुळे मोठा अनर्थ टळला

सौंदत्ती / वार्ताहर

बेळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी शहरातील कॅनरा बँकेत चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, वेळेवर अलार्म वाजल्यामुळे बँकेतील लाखो रुपयांची संभाव्य चोरी टळली आहे.

सौंदत्ती–गोकाक मुख्य रस्त्यावरील कॅनरा बँकेत पहाटे सुमारे २ वाजता एका अज्ञात चोरट्याने मागील बाजूची लोखंडी खिडकी तोडून आत प्रवेश केला. बँकेत डल्ला मारण्याच्या तयारीत असतानाच अचानक सायरन (अलार्म) वाजल्याने चोरटा मास्क घालून घटनास्थळावरून पळून गेला.

घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी चिदंबरम, सीपीआय सुरेश व सौंदत्ती पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथक व फिंगरप्रिंट तज्ञांना पाचारण करण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी सौंदत्ती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. चोरीचा प्रयत्न हाणून पाडल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.