बेळगाव / प्रतिनिधी
राज्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी “स्टंटबाजी” सुरू असून त्याचा दुष्परिणाम संपूर्ण प्रशासनावर झाला आहे, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री आणि खासदार जगदीश शेट्टर यांनी केला आहे.
शुक्रवारी बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, “राज्यात प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून विकासकामे ठप्प झाली आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. अशा स्थितीत राज्यात भ्रष्टाचार अधिकच वाढला आहे.”
शेट्टर यांनी सध्याच्या नेतृत्वावर टीका करताना म्हटले, “मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रशासनावरील नियंत्रण गमावले आहे. बेळगावसाठी मागणी केलेला निधी सरकारने रोखून धरला आहे. एआयसीसी अध्यक्ष असूनही मल्लिकार्जुन खरगे राज्यातील गोंधळ दूर करण्यात अपयशी ठरत आहेत. हा गोंधळ तीन दिवसांत मिटला नाही, तर केंद्राने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी.”
- विकास प्रकल्पांना ‘ब्रेक’ – शेट्टर यांचे आरोप :
बेळगाव – कित्तूर – धारवाड रेल्वे प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ९२७ कोटी रुपये दिले आहेत. तथापि, या प्रकल्पाला सहा वर्षे उलटूनही, विलंब धोरणामुळे राज्य सरकारने अद्याप जमीन भरपाई दिलेली नाही. प्रकल्पासाठी संपादित केलेल्या ४०६.१६ एकर जमिनीच्या भरपाईसाठी १४९.२८ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करूनही राज्य सरकारने अनुदान दिले नाही हे दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या एका महत्त्वाच्या प्रकल्पासाठी बेळगाव शहराची निवड करण्यात आली. त्यानुसार, घनकचरा विल्हेवाटीच्या प्रकल्पासाठी १३५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते, परंतु विविध कारणांमुळे हा प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात अपयश आले आहे. याशिवाय, अमृत योजनेअंतर्गत बेळगाव तालुक्यातील हलगा गावात ७० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे बांधकामही रखडले आहे. ते म्हणाले की, १.१२ एकर जमिनीऐवजी १९.०९ एकर अतिरिक्त जमीन संपादित करण्यात आली असली तरी त्या जमिनीचा मोबदला देण्यास विलंब झाल्यामुळे काम रखडले आहे.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके, शहर अध्यक्षा गीता सुतार, माजी आमदार संजय पाटील, भाजप नेते मुरुगेंद्रगौडा पाटील आणि इतर उपस्थित होते.








