• मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची प्रतिक्रिया

बेळगाव / प्रतिनिधी

राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांवर महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ठाम आणि स्पष्ट भूमिका मांडत अशा चर्चांना थेट फटकारले. बेळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री बदलासंदर्भातील कोणतीही चर्चा राज्य पातळीवर करणे चुकीचे असून तो “अक्षम्य गुन्हा” आहे.

मुख्यमंत्री बदलाबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारचे निर्णय केवळ पक्षाच्या हायकमांडकडून घेतले जातात आणि त्यांचा निर्णयच सर्वांसाठी अंतिम असतो. “दिल्ली पातळीवर जे ठरेल, तेच मान्य करायचे. राज्यात यावर भाष्य करणे योग्य नाही,” असे त्या म्हणाल्या.

आमदारांच्या परदेश दौऱ्यांबाबत विचारणा झाल्यावर त्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे सांगितले. तसेच डी.के. शिवकुमार आणि चन्नराज हट्टीहोळी यांच्या विधानांबाबत प्रतिक्रिया देताना, “ती त्यांची वैयक्तिक भूमिका असू शकते,” असे नमूद केले.

दरम्यान, राजकीय चर्चांबरोबरच त्यांनी बेळगाव ग्रामीण भागाच्या विकासासंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्या. बेळगाव तालुक्याचे नाव ‘बेळगाव ग्रामीण तालुका’ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. हिरेबागेवाडीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर तेथे सुसज्ज बसस्थानक उभारण्याची योजना आखण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

वैभव नगर परिसरातील श्रीराम कॉलनी येथे पाण्याच्या समस्येबाबत नागरिकांनी लक्ष वेधल्यावर, संबंधित प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, मंत्री हेब्बाळकर यांच्या ठाम भूमिकेमुळे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला नवे वळण मिळाले आहे.