बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव पोलिस मुख्यालय परिसरातील वीरभद्रेश्वर मंदिराच्या विकासाबरोबरच, सर्वसामान्य नागरिकांना विवाह, सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध उपक्रमांसाठी सोयीचे ठरणारे आधुनिक कम्युनिटी हॉल उभारण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी यांच्या हस्ते करण्यात आला.

राज्यसभा खासदारांच्या स्थानिक क्षेत्र विकास निधीतून १० लाख रुपये खर्चून हे सभागृह उभारले जात आहे. याप्रसंगी बोलताना खासदार कडाडी म्हणाले, “हे कम्युनिटी हॉल सार्वजनिक हितासाठी असून, याचा अधिकाधिक लोकांनी चांगला उपयोग करून घ्यावा. स्वच्छता आणि शिस्तीला प्राधान्य देण्यात येईल.” ते म्हणाले की, कायदा-सुव्यवस्था राखण्याबरोबरच पोलिस विभाग समाजहिताचे कामही पुढे येऊन करत आहे.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, माजी आमदार अनिल बेनके, नगरसेवक राजशेखर डोणी पोलिस उपअधीक्षक आर.बी. बसरगी, पोलिस निरीक्षक के. ए. गंजी, तसेच भाजपा पदाधिकारी, पोलिस कर्मचारी आणि परिसरातील रहिवासी उपस्थित होते.