पुणे / प्रतिनिधी

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी मधील शाहीस्नान सोहळा आज नीरा नदीमध्ये पार पडला आहे. पुरंदर तालुक्यातील नीरा नदीच्या काठावर आज हा सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी थांबला होता. विश्रांती नंतर हा सोहळा दुपारी एक वाजता निरा स्नानासाठी मार्गस्थ झाला.

नीरा नदीवर असलेल्या जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून माऊलींचा हा लवाजमा स्नानासाठी चालला होता. पुलावरील ते विहंगमय दृश्य पाहण्यासाठी या ठिकाणी वारकरी आणि माऊली भक्तांची मोठी गर्दी जमा झाली होती. हे दृष्य डोळ्यात साठवणे हे एक पर्वणीच मानली जाते. माऊलींच्या पादुका रथातून बाहेर काढण्यात आल्या. त्यानंतर त्या नीरा नदीवरील दत्त घाटावर आणण्यात आल्या. ज्या वेळी या पादुका घाटावर घेवून जाण्यात येत होत्या त्यावेळी माऊली माऊली असा एकच जयघोष सुरू झाला. मंगलमय भक्तीमय वातावरणात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात आले. यावेळी नदी काठी आणी घाटावर भाविकांची तुडुंब गर्दी जमली होती. हा क्षण प्रत्येकाला आपल्या डोळ्यात साठवायचा होता. होणारी गर्दी ही प्रशासनाला आपेक्षित होती.

शिवाय नीरा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी होते. या भागात पाऊस झाल्या मुळे नीरा नदी दुथडी वाहात होती. त्यामुळे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी देखील घेण्यात आली होती. यानंतर माऊलींना तुळशीहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर हा सोहळा हैबतबाबाचे जन्मस्थळ असलेला सातारा जिल्ह्याकडे मार्गस्थ झाला. संत ज्ञानेश्वर माऊलींचा आजचा सोहळा हा लोणंद मध्ये मुक्कामी आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपुरच्या दिशेने निघाली आहे. माऊलींची पालखी आळंदीहून मार्गस्थ झाली आहे. ती पुणे, दिवे घाट, जेजूरी पार करत पुढे सरकली आहे. आषाढी वारी पर्यंत ही पालखी पंढरपुरात दाखल होईल. द्या मार्गावरून ही पालखी जात आहे त्या ठिकाणी भावीक दर्शनासाठी मोठी गर्दी करत आहेत. जेजूरीमध्ये ही तोच अनुभव आला. पालखीचे आगमन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविक एकत्र आले होते. नीरा स्नानानंतर पालखीने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला आहे.