- महापालिका बैठकीत अधिकाऱ्यांवर संताप
- १ लाख अर्ज अद्याप प्रलंबित
- आमदार अभय पाटील यांची तातडीने कार्यवाही करण्याची मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
मतदार ओळखपत्र आणि मतदार यादीतील ‘मॅपिंग’ प्रक्रियेत होत असलेल्या गोंधळामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब सोमवारी झालेल्या बेळगाव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत समोर आली. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या कामकाजावर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली.
सभेत बोलताना महापौर मंगेश पवार यांनी मतदार यादीतील मॅपिंगबाबत महापालिकेकडून पुरेशी जनजागृती झाली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अनेक नागरिक संभ्रमात पडले असून कोणाचाही मतदार यादीतून अपवादानेही वगळला जाऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
काही नागरिकांनी मॅपिंग प्रक्रियेत मोठा गोंधळ होत असल्याची तक्रारही सभेत मांडली. मतदार यादीतील नाव आणि क्रमांक वेगवेगळे दिसत आहेत, तसेच अधिकाऱ्यांकडून “मॅपिंग पूर्ण झाले” असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात माहिती चुकीची नोंदवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
याबाबत महापालिकेचे महसूल अधिकारी सिद्धू हुल्लोळी यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, मॅपिंग झाले नसल्यामुळे कोणालाही मतदार यादीतून वगळले जाणार नाही. ज्या नागरिकांचे मॅपिंग राहिले आहे त्यांनी ते ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करू शकतात किंवा घरात कोणी अनुपस्थित असल्यास पुन्हा प्रक्रिया करता येईल.
दरम्यान, बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी या प्रक्रियेबाबत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. शहरातील दोन्ही मतदारसंघांत मॅपिंगची गती अत्यंत मंद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील अनेक मतदारसंघांत ९० टक्के काम पूर्ण झाले असताना शहरी भागात ही प्रक्रिया ३० टक्क्यांपर्यंतही पोहोचलेली नाही, असे त्यांनी सांगितले.
सध्या सुमारे एक लाख नागरिकांचे अर्ज प्रलंबित असून त्यांची नोंदणी तातडीने पूर्ण करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनीही आपल्या मतदारसंघात जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीस उपमहापौर वाणी जोशी, सत्ताधारी पक्षनेते हनुमंत कोंगाळी, महापालिका आयुक्त कार्तिक एम. तसेच इतर सदस्य उपस्थित होते.








