- जवळपास १२०० टन ऊस जळून खाक
- शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान : अधिकाऱ्यांकडून पाहणी
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील जळगा येथील शेतातील ऊस पिकाला सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ट्रान्स्फॉर्मरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने उडालेल्या ठिणगीमुळे आग लागली.काही वेळातच आगीने रौद्ररूप घेतल्याने आसपासच्या उसालाही आग लागल्याने आगीचा भडका मोठ्या प्रमाणात होता. आग लागल्याचे दिसून येताच जळगा ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. खानापूर अग्निशमन दलाचा बंब आणि जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र उन्हाळी पिकासाठी जमीन भिजविण्यात आल्याने आगीच्या ठिकाणी अग्निशमन दलाचा बंब पोहोचण्यास अडचणी निर्माण झाल्याने आग आटोक्यात आणण्यात अपयश आले. त्यामुळे आसपासचा जवळपास १२०० टन ऊस आगीत भस्मसात झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे, अंदाजे ४० लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे.
सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास जळगा येथील लाड बंधूच्या शेतात असलेल्या ट्रॉन्स्फॉर्मरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आगीच्या ठिणग्या उसाच्या पिकात पडल्याने उसाने पेट घेतला. पाहता पाहता आग मोठ्या प्रमाणात पसरली. आग लागल्याचे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना निदर्शनासं आल्याबरोबर आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. मात्र सलग लागून असलेल्या शेतामुळे आणि भर उन्हात वारा असल्याने लागून असलेल्या उसालाही पाहता पाहता आग लागली.
यात नारायण गुरव, परशराम लाड, सुनिल लाड, नामदेव लाड, विठ्ठल लाड, मारुती लाड, सुनिता लाड, भरमाणी लाड, दत्तात्रय गुरव, परशराम गुरव, परशराम शिवाजी गुरव, मारुती पाटील, बाबू गुरव, बाजीराव पाटील, निंगाप्पा पाटील, चंद्रकांत पाटील, नारायण पाटील, मालोजी पाटील, राजाराम पाटील, बबन गुरव, व्यंकाप्पा पाटील, अर्जुन पाटील, नागेश गुरव, महेश पाटील, विठ्ठल पाटील यासह इतर शेतकऱ्यांच्याही उसाला आग लागली. त्यामुळे जवळपास १२०० टन ऊस जळून खाक झाला. उसाला आग लागल्याचे समजताच खानापूर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान बंब घेऊन घटनास्थळी हजर झाले. मात्र उन्हाळी मिरची आणि इतर पिकासाठी जमीन ओली करण्यात आल्याने आग विझविण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागला. तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. आगीचे आणि धुराचे लोळ यामुळे आग विझविण्यास पराकाष्ठा करावी लागत होती.








