बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरात सुरू असलेल्या कन्नडसक्ती विरोधात महापालिका सभागृहात आवाज उठवलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तीन नगरसेवकांचा शिवसेना बेळगावच्या वतीने सोमवारी सत्कार करण्यात आला.
सध्या बेळगाव महापालिकेच्या सभागृहात महाराष्ट्र एकीकरण समितीचे केवळ तीनच नगरसेवक आहेत. मात्र सदस्य संख्येने केवळ तीन सदस्य राहिले असले तरी त्यांनी मराठी अस्मितेच्या बाबतीत नेहमीच आवाज उठवलेला आहे.
सध्या महापालिका आयुक्तांनी लागू केलेल्या कन्नड सक्ती विरोधात नगरसेवक रवी साळुंखे , शिवाजी मंडोळकर आणि वैशाली भातकांडे अनेक जोरदार आवाज उठवत मराठी बाणा दाखवला होता. यासाठी शिवसेनेच्यावतीने त्यांचा सन्मान करून प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रकाश शिरोळकर,माजी महापौर सरिता पाटील, तालुकाप्रमुख सचिन गोरले यांच्यासह जेष्ठ शिवसैनिक महेश टंकसाळे, युवा समिती सीमाभागचे शुभम शेळके, धनंजय पाटील, शिवसेनेचे राजकुमार बोकडे, सिद्धार्थ भातकांडे आदी उपस्थित होते.