बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग बेळगाव यांच्या वतीने मराठी अस्मितेची जागृती आणि महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ‘मराठी सन्मान यात्रा’ काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर रविवारी २५ जानेवारी २०२६ रोजी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे व क्रांतीभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
महाड शहराच्या मध्यभागी असलेल्या चवदार तळ्याला सामाजिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. एकेकाळी अस्पृश्यांना या तळ्याच्या पाण्याचा वापर करण्यास बंदी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह करून समाजातील सर्व घटकांसाठी पाण्याचा हक्क मिळवून दिला आणि २० मार्च १९२७ रोजी हे तळे सर्वांसाठी खुले झाले.
याच पवित्र स्थळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष रवींद्र साळवे यांनी उपस्थितांचे स्वागत करून बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला तसेच सीमाप्रश्नी सीमावासीयांच्या पाठीशी सदैव उभे राहण्याची ग्वाही दिली. स्मारक समितीचे प्रशांत जाधव, दीपक घाडगे आणि प्रदीप सकपाळ उपस्थित होते.
यावेळी बोलताना शुभम शेळके म्हणाले की, “ज्या बाबासाहेबांनी देशाची घटना लिहिली, त्याच संविधानावर विश्वास ठेवून सीमावासीय गेली सत्तर वर्षे लोकशाही मार्गाने लढा देत आहेत. बाबासाहेबांच्या आशीर्वादाने सीमाप्रश्नी नक्कीच न्याय मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
कार्यकर्त्यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ तसेच ‘बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
याप्रसंगी नगरसेवक शिवाजी मंडोळकर, महादेव पाटील, शिवाजी हवळाणाचे, मोतेश बारदेशकर, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष नारायण मुचंडिकर, अशोक घगवे, श्रीकांत नांदूरकर, सुरज जाधव, सचिन दळवी, ॲड. वैभव कुट्रे, रायगड जिल्हा प्रतिनिधी, पत्रकार नरेश पाटील, रमेश माळवी, भूपाल पाटील, महेंद्र जाधव, सुशांत देसाई, निखिल देसाई, प्रकाश हेब्बाजी आदी उपस्थित होते.
दरम्यान, सोमवार २६ जानेवारी २०२६ रोजी सुमारे २०० ते २२५ कार्यकर्ते किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन मराठी सन्मान यात्रेची औपचारिक सुरुवात करणार आहेत.








