बेळगांव : सर्वोच्च न्यायालयात २२ वर्षे रेंगाळत पडलेल्या सीमाप्रश्नाच्या दाव्याची सुनावणी त्वरित व सलगपणे करावी, या मागणीसाठी बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सीमाभागातून एक लाख सह्यांचे निवेदन सरन्यायाधीशांना देण्यात येणार आहे. सह्यांच्या या मोहिमेस सर्व भागांतून वाढता प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी चव्हाट गल्ली भागात सह्यांच्या मोहिमेस प्रारंभ झाला. पहिले सीमा सत्याग्रही अमृतराव हसबे यांच्या धर्मपत्नी श्रीमती मंदा यांनी पहिली सही करून मोहिमेस प्रारंभ केला.

१९५६ साली जयंतराव टिळक यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीसिंह नाना पाटील चौकात झालेल्या सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत अमृतराव सहभागी झाले होते. याबद्दल त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. अमृतराव यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई रामराव हसबे यांनीही महिला सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत भाग घेऊन तुरुंगवासाची शिक्षा भोगली होती. सह्या संकलनाच्या प्रारंभावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.