येळ्ळूर : मराठी मॉडेल शाळा, येळ्ळूर यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.डी.एम.सी. अध्यक्षा सौ. दिव्या संदीप कुंडेकर होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या विद्यार्थ्यांनी विश्वस्तव आणि स्वागतगीत सादर करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन एस.डी.एम.सी. उपाध्यक्ष श्री. जोतिबा यल्लाप्पा उडकेकर यांच्या हस्ते, तर सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन एस.डी.एम.सी. सदस्या सौ. अलका सुनील कुंडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री. राजेंद्र चलवादी यांनी केले. यावेळी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सहावीची विद्यार्थिनी कु. तन्वी संतोष पाटील हिने विविध आखाडा कुस्ती स्पर्धांमध्ये क्रमांक पटकाविला, तर पाचवीचा विद्यार्थी कु. जयदेव शशिकांत पाटील याने बेंगळुरू येथे झालेल्या स्टेट लेव्हल स्कूल ऑलिम्पिक चॅम्पियनशिपमध्ये २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत चौथा क्रमांक मिळविला. तसेच ज्ञानदीप युवा संघ, किणये यांच्या वतीने आयोजित सामान्यज्ञान स्पर्धेत कु. आराध्या मुर्तीकुमार माने व कु. स्वरांजली सुधीर मानकोजी यांनी क्रमांक पटकाविला.

यानंतर विद्यार्थ्यांनी पथसंचलन सादर केले. क्रीडा स्पर्धांची प्रज्योत कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. दिव्या संदीप कुंडेकर यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. क्रीडा शपथ शाळेचा क्रीडामंत्री कु. वेदांत मनोहर कंग्राळकर याने सर्व स्पर्धकांच्या उपस्थित घेतली.

या क्रीडा स्पर्धांचे आयोजन शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री. राजेंद्र चलवादी, शारीरिक शिक्षक श्री. सतीश पुंडलिक पाटील तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी केले. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांसाठी १०० सुवर्णपदके एस.डी.एम.सी. उपाध्यक्ष श्री. जोतिबा यल्लाप्पा उडकेकर, १०० रौप्यपदके एस.डी.एम.सी. सदस्या सौ. अलका सुनील कुंडेकर, ५० कास्यपदके शारीरिक शिक्षक श्री. सतीश पुंडलिक पाटील, तर २०० प्रमाणपत्रे एस.डी.एम.सी. सदस्य श्री. चांगदेव शिवाजी मुरकुटे यांनी देणगी स्वरूपात दिली.

यावेळी उपाध्यक्ष श्री. जोतिबा उडकेकर यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना सर्व स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. दिव्या कुंडेकर यांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत सहशिक्षक श्रीमती सातेरी पाखरे यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षिका श्रीमती एम. एस. मंडोळकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन सहशिक्षिका सौ. मेघा देसाई यांनी मानले. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, सदस्या, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.