बेळगाव / प्रतिनिधी
भावा बहिणींच्या नात्याचा गोडवा जपणाऱ्या राखी पौर्णिमेनिमित्त विविध सामाजिक संस्थांच्या महिला व विद्यार्थिनीतर्फे मराठा सेंटर बेळगाव येथे जवानांचा सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यात आला. राखी पौर्णिमेनिमित्त विविध सामाजिक संस्थांच्या महिला व विद्यार्थिनींनी आज शुक्रवारी सकाळी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरला खास भेट दिली. तसेच देशाचे संरक्षण करणाऱ्या तेथील जवान आणि अग्निविरांच्या मनगटावर भाऊ व बहिणी मधील अतूट प्रेमाचे प्रतीक असलेली राखी बांधून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला.
या कार्यक्रमात बेळगाव शहरासह आसपासच्या परिसर तसेच कोल्हापूर व गोवा येथील भगिनींचा सहभाग होता. याप्रसंगी बोलताना एमएलआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी सर्वप्रथम मराठा सेंटरच्यावतीने उपस्थित सर्व भगिनींचे हार्दिक स्वागत केले. रक्षाबंधनाचा पवित्र सण आपण सर्वजण आमच्या सोबत साजरा करत आहात ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. आज तुम्ही आम्हाला जो सन्मान दिला आहे त्याबद्दल आम्ही तुमचे सदैव आभारी राहू. आम्ही आज देशाचे तुमचे संरक्षण करण्याचे जे काम करत आहोत ते आमचे कर्तव्यच आहे. कर्तव्य, मान, साहस या तीन गोष्टी ध्यानात ठेवून आम्ही काम करत असतो. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर ही संरक्षण दलाची सर्वात जुनी रेजिमेंट असून जी स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे १९२२ पासून बेळगावमध्ये अस्तित्वात आहे. या पद्धतीने आमच्या रेजिमेंटला या ठिकाणी १०० वर्षे पूर्ण झाली असून अजून हजारो वर्षे आम्ही येथे राहू. बंधू मानून तुम्ही आम्हाला राखी बांधली बहिण-भावाचे हे नाते असेच यापुढेही कायम राहून वृद्धिंगत होत राहील, असे सांगून देव ना करो तुमच्यावर कोणते संकट अथवा आपत्ती येवो, मात्र जर का तसेच झाले तर केंव्हाही मदतीसाठी आम्हाला हाक मारा.आम्ही तुमच्या मदतीसाठी सदैव तयार असू असे ब्रिगेडियर मुखर्जी यांनी शेवटी स्पष्ट केले.