बेळगाव / प्रतिनिधी

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे येत्या दि. 2 ते दि. 9 ऑगस्ट 2025 दरम्यान अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर क्लार्क आणि अग्निवीर ट्रेडसमॅनसाठी युनिट हेडकॉटर्र कोटा (युएचक्यू) अग्निवीर भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

सदर मेळावा फक्त युद्ध विधवा, सैनिक, माजी सैनिक आणि युद्धात मृत्युमुखी पडलेल्यांचे सखे भाऊ, सैनिक, माजी सैनिक (सैन्य) गुणवंत खेळाडू आणि फक्त संगीतकार यांच्या पाल्यांसाठी आहे. भरती होण्यासाठी 1 ऑक्टोबर 2025 रोजी सर्व श्रेणींसाठी उमेदवारांची वयोमर्यादा 17 वर्षे 6 महिने ते 21 वर्षे इतकी असावी. शारीरिक आणि वैद्यकीय चांचणीत पात्र ठरलेल्यांसाठी सामान्य प्रवेश परीक्षा (सीईई) सप्टेंबर 2025 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात घेतली जाईल. भरतीसाठी उपलब्ध असलेल्या शाखानिहाय रिक्त पदांची उपलब्धता (उत्कृष्ट खेळाडूसह) खालीलप्रमाणे आहे.

उत्कृष्ट खेळाडू आणि मुलांसाठी स्पोर्ट्स कंपनीचे उमेदवार : सर्व राज्यांसाठी -फक्त अग्निवीर जनरल ड्युटी. अग्निवीर १० वी उत्तीर्ण : सर्व राज्यांसाठी – अग्निवीर (विविध कारागीर), अग्निवीर (शेफ), अग्निवीर (ड्रेसर), अग्निवीर (संगीतकार), अग्निवीर (कारभारी), अग्निवीर (सहाय्यक कर्मचारी), अग्निवीर (वॉशरमन). अग्निवीर 8 वी उत्तीर्ण : सर्व राज्यांसाठी – अग्निवीर (मेस कीपर), अग्निवीर (हाऊस कीपर).

भरती मेळाव्यात सहभागी होणाऱ्या सर्व उमेदवारांनी मूळ शिक्षण प्रमाणपत्रे, नातेसंबंध प्रमाणपत्र, तहसीलदारांच्या स्वाक्षरीचे जाती/सामुदायिक प्रमाणपत्र, गाव सरपंचांच्या स्वाक्षरीचे चारित्र्य प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, तहसीलदारांच्या स्वाक्षरीचे जन्म/कायमस्वरूपी निवास प्रमाणपत्र, पोलिस अधीक्षकांनी स्वाक्षरी केलेले पोलिस पडताळणी प्रमाणपत्र, एनसीसी प्रमाणपत्र (लागू असल्यास), गाव सरपंचांकडून अविवाहित असल्याचे प्रमाणपत्र, इतर सर्व संबंधित कागदपत्रे आणि 25 पासपोर्ट आकाराचे फोटो या सर्व कागदपत्रांच्या दोन छायाप्रतीसह स्वतःसोबत आणणे आवश्यक आहे.

सैन्य नोंदणी ही केंद्र सरकारची संस्था असल्याने सर्व कागदपत्रे हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असणे आवश्यक आहे. अग्निवीर उमेदवारांची मुदत आणि शर्ती (नोंदणी, सेवा, सेवानिवृत्ती) रोजगारक्षमता, रजा, वेतन, भत्ता आणि संबंधित फायदे www.joinindianarmy.nic.in वेबसाइटवर उपलब्ध आहेत, असे मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावतर्फे कळविण्यात आले आहे. उमेदवारांना दिशाभूल करू शकणाऱ्या दलालांपासून सावध केले जाते आणि कोणत्याही दलालांना कोणतेही कागदपत्रे आणि प्रमाणपत्र देऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.