हुक्केरी / वार्ताहर
बाजारपेठेत लोकांची वर्दळ सुरू असतानाच धारदार शस्त्रांनी वार करून एका युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. सोमवारी सकाळी हुक्केरी शहरात घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. मल्लिक हुसेन किल्लेदार (वय २५) असे मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार हुक्केरी पेठेत मोटारसायकलवरून जात असताना दोन संशयितांनी हुसेनवर प्राणघातक हल्ला केला. ही हत्या मालमत्तेच्या वादातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. हत्येचे दृश्य स्थानिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या प्रकरणी हुक्केरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी श्यानूर जमखंडी (वय २४) आणि बशीर किल्लेदार (वय ३८) या दोघांना अटक करून चौकशी सुरू केली आहे. दरम्यान दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.