- माजी नगरसेवकांचे महापौरांना निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव महापालिकेकडून कोणतीही पूर्वसूचना न देता लागू करण्यात आलेल्या ३ टक्के मालमत्ता करवाढीविरोधात माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी आज महापालिकेत धडक देत तीव्र नाराजी व्यक्त केली. महापौर मंगेश पवार यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने या निर्णयाचा निषेध नोंदवत करवाढ तातडीने रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
महापालिकेच्या मागील सभेत ही करवाढ ज्या पद्धतीने मंजूर करण्यात आली, ती प्रक्रिया लोकशाही तत्त्वांना बाधक असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला. कोणतीही पूर्वसूचना न देता आणि नागरिकांचा विचार न करता करण्यात आलेली ही वाढ सर्वसामान्य बेळगावकरांच्या आर्थिक गणितावर परिणाम करणारी असल्याने प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणीही करण्यात आली.
या प्रकरणावर माजी नगरसेवक नागेश सातेरी यांनी सभेतील प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सभेच्या विषयपत्रिकेत नसतानाही कर वाढीचा मुद्दा मांडण्यात आला, हा सभागृहाचा अपमान असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर किंवा स्थायी समितीचे अधिकार डावलून कौन्सिल सेक्रेटरींकडून हा ठराव कसा मांडला गेला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरवर्षी लादली जाणारी ही ३ टक्क्यांची करवाढ जनतेवर अन्यायकारक असल्याचे मत त्यांनी व्यक्त करत पालिकेने महसूल वसुलीची पद्धत सुधारण्याची गरज असल्याचे नमूद केले.
यावेळी शिष्टमंडळाने शहरातील इतर काही ज्वलंत प्रश्नांकडेही महापौरांचे लक्ष वेधले. जन्म-मृत्यू दाखल्यांबाबत लोकअदालतीने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी मागणीही करण्यात आली.
या शिष्टमंडळात नागेश सातेरी यांच्यासह माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, निवृत्त कर्मचारी अमरोळकर आणि दीपक सावंत यांचा सहभाग होता. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन मालमत्ता करवाढीबाबत फेरविचार केला जाईल आणि योग्य तो दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन महापौर मंगेश पवार यांनी यावेळी दिले.








